(जन्म – ६ डिसेंबर, इ.स. १८६१ – ९ मे, इ.स. १९१९)
लक्ष्मीबाई टिळक या त्यांच्या पत्नी . त्या शिकलेल्या नव्हत्या. पण टिळक यांनी त्यांना शिकण्यास प्रोत्साहन दिले. त्या जीवनाच्या शाळेत शिकल्या. पुढे त्यादेखील कविता लिहू लागल्या. त्यांनी ‘स्मृतिचित्रे’ या पुस्तकात टिळक यांच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत.
ते मराठीतील अजरामर साहित्य ठरले.!
टिळक यांचा स्वभाव विलक्षण होता. त्यामुळे नवरा-बायकोची भांडणे होत. रुसवेफुगवे घडत. पण दोघांचे प्रेम एकमेकांवर खूप होते. त्या दोघांचा संसार दारिद्र्याचा होता. लक्ष्मीबार्इंची बेरीज व टिळक यांची वजाबाकी असा तो प्रकार होता. एकदा, लक्ष्मीबार्इंनी टिळक यांच्याकडे पैसे दिले; त्यांना बाजारात जाऊन तांदूळ आणण्यास सांगितले. पण, टिळक यांनी त्याऐवजी शाईची दौत आणली. लक्ष्मीबार्इंना राग आला.
“ही बघ दौत, किती छान आहे!” टिळक म्हणाले.
“आता काय, मी ही दौत शिजत घालू? काय म्हणावे या कर्माला?” लक्ष्मीबाई हताश होत म्हणाल्या.
टिळक यांनी ती दौत माडीवरून रस्त्यात फेकून दिली. ते ओरडून म्हणाले, “तुला मानसशास्त्र समजत नाही.”
तेव्हा लक्ष्मीबाईदेखील कडाडल्या, “ते तुकारामाच्या जिजाईलादेखील कळले नसेल. सॉक्रेटिसच्या बायकोलादेखील समजले नसेल.”
टिळक मुलांवर आईगत प्रेम करत. त्यांना मूल झाले, की ते खूप आनंदी होत. त्यांची दोन मुले देवाघरी गेली तेव्हा ते खूप व्याकूळ झाले होते. मोठा मुलगा विद्यानंद – मरण पावला तेव्हा त्यांनी ‘बापाचे अश्रू’ हे करूण काव्य लिहिले. त्यांनी त्यांच्या घरात अनाथ मुलांना वाढवले. ते खूप मुलांचे ‘पप्पा’ बनले. बालकवी तर त्यांच्या घरी वाढले. बालकवी अहमदनगरहून पुण्याला नोकरीसाठी गेले. टिळक यांना त्यांचा विरह सहन झाला नाही. त्यांनी कविता लिहिली – ‘पाखरा! येशील कधी परतुनि…’ ती कविता खूप गाजली. त्यांची दत्तू नावाच्या मुलासंबंधी एक कविता आहे. तीतून त्यांचा मुलांसंबंधी लळा व्यक्त होतो.
‘नाना नाना म्हणताचि
शरदश्चंद्र धावून आला|
घे घे घे घे म्हणूनी
बिलगे बाळ माझ्या तनूला||
आले माझे नयन भरून,
घेतला चुंबियेला|
गेला माझा श्रमभार पळे
दूर ते सर्व गेला||’
ते देशासाठी मरण्यास केव्हाही तयार होते. त्यांची देशनिष्ठा अफाट होती. ते ती वारंवार बोलून दाखवत. त्यांनी येशूवर प्रेम केले, तितकेच भारत देशावर प्रेम केले. ते सगळ्यांचे मित्र म्हणून जगले. ते गरिबीत जगले. कफन्या घालून वावरले. अखेरपर्यंत भजन करत राहिले. त्यांची ब्रह्मानंदी टाळी नेहमी लागलेली असायची. ते सतत अभंग गात असत. ते ख्रिस्तवासी १० मे १९१९ रोजी झाले. ते मृत्यूला देवाची आज्ञा मानत. देवाचे बोलावणे हे नवजीवन आहे ही त्यांची श्रद्धा होती.
भास्करराव उजगरे संपादित ‘टिळकांची कविता भाग १’ संग्रह ‘व्हिनस’तर्फे १९१४ साली प्रकाशित झाला. त्यांनीच संपादित केलेला ‘अभंगांजली’ हा टिळक यांचा दुसरा संग्रह पाच वर्षांनी (१९१९ ) प्रसिद्ध झाला.
‘अभंगांजली’मध्ये ‘पश्चात्ताप आणि शरणागती’, ‘टिळक आणि ख्रिस्तदर्शन’, ‘प्रार्थना’, ‘योग आणि योगस्पृहा’, ‘श्रद्धा आणि आत्मानुभव’, ‘वैराग्य’, ‘वियोग व उत्कंठा’, ‘निषेध’, ‘उपदेश’, ‘विशेष प्रसंग’, ‘प्रेम आणि सेवा’, ‘आयुष्याची क्षणभंगुरता’, ‘आजार आणि मृत्यू’ ह्या तेरा विषयांच्या अंतर्गत वर्गीकरण केलेले एकूण तीनशे अभंग आहेत. परिशिष्टातील आठ, समर्पणाचा एक असे आणखी नऊ अभंग आहेत.
— जोसेफ तुस्कानो